प्रतिनिधी -किरण शिंदे
वाकडी( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरू योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरविण्यात आलेल्या श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात साडेपाच फूट लांबीचा नर जातीचा शाकाहारी ग्रीन इगुआना सरडा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भव्य आकार, वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना,पाठीवरील काटेरी शल्कांमुळे हा परदेशी सरडा प्रदर्शनातील आगळेवेगळे आकर्षण ठरला आहे.
या सरड्याचे पालन पोषण किशोर चव्हाण, सिद्धार्थ चौधरी हे आपल्या राहत्या घरात करीत आहे. उष्णता खेचून सभोवताली तीव्रता कमी करण्याची क्षमता असलेल्या या सरड्याचे टोनी असे नाव आहे हा सरडा हिरवा भाजीपाला खातो याचे वजन 22 किलो आहे भारतात सर्वात मोठा मोठा असलेला हा सरडा केरळ येथून आणला असल्याचे किशोर चव्हाण यांनी सांगितले या सरड्याचे आता दहा वर्षे वय आहे याची वयोमर्यादा 25 ते 30 वर्षे आहे विशेष म्हणजे हा सरडा स्वच्छतेसाठी घराबाहेर जात असल्याचे चव्हाण व चौधरी यांनी सांगितले
ग्रीन इगुआनाची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना आणि मोठा आकार पाहून लहान मुलांसह नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकजण त्याची माहिती जाणून घेत असून,त्याच्यासोबत छायाचित्रेही काढताना दिसत आहेत. सप्ताहस्थळी या ग्रीन इगुआनाचे आकर्षक फ्लेक्सही लावण्यात आले असून, त्याची वैशिष्ट्यपूर्ण छबी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
धनगरवाडी पंचक्रोशीत आयोजित या सप्ताहाच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या आकाराच्या परदेशी सरड्याची उपस्थिती कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यामुळे श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनातील ग्रीन इगुआना हे भाविकांच्या आणि नागरिकांच्या चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे.
१७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित श्री गंगागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दि. १८ ते २५ ऑगस्टदरम्यान सुरू राहणार आहे. शेतीविषयक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध आकर्षणांचा संगम असलेल्या या प्रदर्शनामुळे श्रीक्षेत्र धनगरवाडीतील सप्ताहाला आणखी एक आगळावेगळा रंग मिळाला आहे.




Total Users : 617769