छ.संभाजीनगर( जनता आवाज वृत्तसेवा):-आज संभाजीनगर येथे काळजाला पिळून टाकणारी घटना घडली असून पोटच्या मुलाला मृत्यूच्या दारातून मागे खेचण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही मुलासोबत डोंगरावरून पडून दुर्दैवी अंत झाल्याची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील खवड्या (खवल्या) डोंगरावर शुक्रवारी ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
क्षणभराचा राग आणि कौटुंबिक वादातून एका हसतखेळत्या कुटुंबाची अशी राखरांगोळी झाल्याने संपूर्ण वाळूज परिसर आणि तिसगाव सुन्न झाले आहे. कुणाल मुरलीधर छानबुडे (वय १८), त्याचे वडील मुरलीधर छानबुडे आणि आई संगीता छानबुडे अशी या दुर्दैवी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या तिघांची नावे आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १८ वर्षीय कुणाल कौटुंबिक वादातून रागाच्या भरात तिसगाव येथील खवड्या डोंगरावर गेला. डोंगराच्या धोकादायक कड्यावर उभे राहून तो जीवन संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी व माजी सरपंच संजय जाधव यांनी त्याला मागे सरकण्याचे आवाहन केले. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मुलाला संकटात पाहून घाबरलेले वडील मुरलीधर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुणालला पकडून मागे खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी कुणालने डोंगरावरून खाली उडी मारली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडल्याने वडील मुरलीधर हेही थेट डोंगरावरून खाली कोसळले.
हा सर्व थरार डोळ्यांसमोर घडताना पाहून मुलाच्या आई संगीता छानबुडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पती आणि पोटचा मुलगा डोळ्यांसमोर डोंगरावरून खाली पडल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांनीही कसलाही विचार न करता त्याच कड्यावरून खाली उडी घेतली. तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी तीव्र वेगाने खाली आदळल्याने अग्निशमन दलाने लावलेली जाळी अपुरी पडली. तिघांचाही गंभीर दुखापतींमुळे घटनास्थळीच करुण अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी सहकाऱ्यांसह मदतकार्य राबवून मृतदेह ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून कुणाल डोंगरावर गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, वाळूज पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.




Total Users : 617914