सोनई( जनता आवाज वृत्तसेवा):- पिकांवर झाडांची सावली पडून नुकसान होत असल्याने एका शेतकऱ्याने झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. मात्र याच प्रकाराचा आधार घेत एका चॅनल व वेबसाईटसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडून संबंधित शेतकऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सोनई परिसरात आहे.
या प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती असून, त्यानंतर काही अधिकृत माध्यमांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील काही गैरसमज दूर झाल्याचे सांगण्यात येते.
सोनईतील प्रकाराने नवे प्रश्न
सोनई परिसरात यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे माध्यमांच्या नावाखाली नागरिकांवर दबाव आणला जात आहे का? संबंधित व्यक्तीला अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सोनई परिसरातील एका अलीकडील घटनेची पोलिस ठाण्यात नोंद असून तिचा तपास सुरू आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे अधिकृत निवेदन नसतानाही एका वेबसाईटवर तपास रखडल्याच्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्याची चर्चा आहे. हे वृत्त नेमक्या कोणत्या अधिकृत अथवा विश्वसनीय माहितीच्या आधारे प्रसिद्ध झाले, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
नेवाशातील चर्चेने सोनईतील जुन्या प्रकरणांना उजाळा
नेवाशातील यूट्यूब व वेबसाईटशी संबंधित प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोनईतील या जुन्या प्रकाराचीही चर्चा पुढे आली आहे. संबंधित चॅनल किंवा वेबसाईटचे मालक, चालक व प्रतिनिधी कोण आहेत, त्यांचे अधिकृत प्रतिनिधित्व काय आहे आणि विविध प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे, याची पडताळणी करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित शेतकरी, संबंधित व्यक्ती तसेच विभागाची अधिकृत बाजू समोर आल्यानंतरच अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे चर्चेपेक्षा कागदोपत्री पुरावे आणि अधिकृत चौकशीला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.




Total Users : 620860