spot_img
spot_img

नेवाशात गांजाच्या शेतीची लागवड तब्बल ४० ते ५० गांजाची जिवंत झाडे तसेच सुमारे १७० किलो वाळवलेला गांजा जप्त

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा):-  नेवासा तालुक्यात महिनाभराच्या वडूले शिवारात शेतीमध्ये गांजाची लागवड करून त्याची सुकवण आणि छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे नेवासा पोलिसांनी दि. ३१रोजी वडूले शिवारात धाड टाकून तब्बल ४० ते ५० गांजाची जिवंत झाडे तसेच सुमारे १७० किलो वाळवलेला गांजा जप्त केला.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबऱ्यामार्फत वडूले शिवारात गांजाची लागवड आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना देत सापळा रचला. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी वडूले शिवारातील शेतकरी बबन शंकर देशमुख (वय ६०) यांच्या मालकीच्या शेतीवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान शेतात गांजाची ४० ते ५० जिवंत झाडे आढळून आली. तसेच मोठ्या प्रमाणात वाळवलेला गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची पंचांसमक्ष नोंद करून तो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेवासा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शेवगाव उपविभागीय पोलीस उपाधिक्षक निरजकुमार राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली वाकडी शिवारात आणि आता वडूले येथील गांजाची शेती वर महिनाभरातील दुसरी कारवाई करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.

या कारवाईत डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुमित करंजकर,बंटी काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, अप्पा वैद्य, गवळी, वाघ, नारायण डमाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीता पवार, खंडागळे तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते.

‘ड्रग्स अथवा अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत नागरिकांना कोणतीही गोपनीय माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने डायल ११२ किंवा नेवासे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल,’

– पोलीस निरीक्षक प्रताप दराडे 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!