spot_img
spot_img

अखेर हणमंतगावला धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

हणमंतगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील हणमंतगावं येथील धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात अखेर वनविभाग आणि प्राणीमित्र यांना यश आले.

गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने हणमंतगावं परिसरात उच्छाद मांडला होता. शेतात काम करीत असताना मच्छिंद्र भाऊसाहेब जेजुरकर यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते त्यांनतर त्या बिबट्याने विलास गोकुळ जेजुरकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आणि नंतर अजिंक्य विलास घोलप यांच्या वस्तीवर येऊन कोंबड्यांचा फडशा पाडत होता. परंतु रविवारी दुपारी हा बिबट्या कोंबडीच्या शोधात घोलप यांच्या वस्तीवर आला व कोंबडीवर झेप घेतली परंतु कोंबडी त्याच्या तावडीतून निसटली व समोर खेळणाऱ्या साडेतीन वर्षे वयाच्या अद्विक अजिंक्य घोलप याच्यावर त्याची नजर पडली. परंतु शेजारीच असलेल्या साक्षी सुनिल घोलप हिने प्रसंगावधान राखत अद्विकला उचलून गोठ्यात नेले. साक्षीच्या काही क्षणांच्या प्रसंगावधानामुळे अद्विकचा जीव वाचवला होता.

या सर्व घटनांमुळे हणमंतगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटील हे प्रवरा कारखान्याचे संचालक अशोकराव घोलप यांच्या दारावर गेले असता स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. विखे पाटील यांनी तात्काळ वनविभागास बिबट्या जेरबंद करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभाग आणि प्राणीमित्र यांनी परिसरात पिंजरे लावले. त्यामुळे मंगळवारी रात्री १० वाजता अजिंक्य विलास घोलप यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. परंतु एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी दुसरा बिबट्या पिंजऱ्याबोबती चक्कर मारताना दिसला.

काल रात्री १० वाजता बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांनी अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ व कोपरगांव चे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना देण्यात आली. त्यांनतर जेरबंद बिबट्या हलविण्याची कार्यवाही वनरक्षक प्रतीक गजेवर व मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांनी केली

बिबट्या जेरबंद करण्याची विकास म्हस्के यांची अनोखी पध्दत तिसऱ्यांदा यशस्वी झाली.मागे एकदा माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शेतात नंतर लोणी हळपट्टी भागात मनिषा कोते यांच्या शेतात व आता अजिंक्य घोलप यांच्या वस्तीवर बिबट्या जेरबंद करण्याची ही पद्धत यशस्वी झाली. पद्धत अशी आहे भक्षाच्या पिंजऱ्यात शेळी ठेवली असता ती थोडावेळ आवाज काढते आणि शांत होऊन जाते. पण त्या शेळीच्या पिंजऱ्यात शेळीच्या आवाजाचा भोंगा लावल्यास त्यातून निघणाऱ्या शेळीच्या आवाजाला फसून बिबट्या अलगत जेरबंद होतो.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!