spot_img
spot_img

संदीप कृषी महाविद्यालय महिरावणीत नव्या स्वप्नांचा दिक्षा आरंभ नवागत विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेश

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):- संदीप फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, महिरावणी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ कार्यक्रम २०२६-२७’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कृषी शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून मार्गदर्शन, प्रेरणा आणि नव्या संधींची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ आणि दैनिक सकाळ व अॅग्रोवन, नाशिकचे जिल्हा प्रतिनिधी श्री. मुकुंद पिंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संदीप फाउंडेशनचे ओएसडी डॉ. विवेक निकम, डॉ. डी. डी. शिंदे, डीन अॅकेडेमिक्स, संदीप युनिवर्सिटी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने झाली.

प्रमुख पाहुणे डॉ. पी. एन. रसाळ यांनी नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कृषी शिक्षणातील विविध संधी, बदलते कृषी तंत्रज्ञान तसेच शेतकरी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे देशाच्या सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचलेल्या कार्याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करून उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहन केले.

श्री. मुकुंद पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण घेत असताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. आपल्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करून कृषी क्षेत्राला पुढे नेले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. कृषी क्षेत्र अमर्यादित संधींचे क्षेत्र असून, कृषी धोरणे आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाच्या कृषी क्षेत्राने जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहन करत त्यांनी सह्याद्री फार्म्सचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले.

डॉ. विवेक निकम यांनी संदीप फाउंडेशनच्या विविध शाखांची माहिती देतानाच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व इतर सोयी-सुविधांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. डी. डी. शिंदे यांनी संस्थेच्या विस्ताराची यशोगाथा सांगत आपल्या ओघवत्या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयाची शैक्षणिक धोरणे, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. “महाविद्यालयाची ही पहिली बॅच असून, तुम्ही आमच्यासाठी खूप विशेष आहात,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वरी पवार आणि डॉ. शिवकुमार वरारकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!