नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालय, महिरावणी येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामतीने, तर मुलींच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेने विजेतेपद पटकावले.
संदीप फाउंडेशनच्या क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील १४ मुलांचे आणि १४ मुलींचे संघ सहभागी झाले. स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे व रोमांचक झाले.
मुलांच्या गटात बारामतीच्या डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाने प्रथम, कृषी महाविद्यालय पुणेने द्वितीय, तर शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूरने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदेने प्रथम, शासकीय कृषी महाविद्यालय पुणेने द्वितीय, तर कृषी महाविद्यालय जैनापूरने तृतीय क्रमांक पटकावला.
बक्षीस वितरण समारंभास संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. व्ही. आर. आवारी, क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी शरद पाटील, संदीप फाउंडेशनचे ओएसडी डॉ. विवेक निकम, संदीप विद्यापीठाचे डीन अकॅडेमिक्स डॉ. डी. डी. शिंदे, प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, डॉ. पी. एस. कचरे, डॉ. बी. डी. भाकरे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. परेश रेगे, निरीक्षक व निवडकर्ता प्रा. एस. एस. निरगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. संदीप झा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. डॉ. व्ही. आर. आवारी यांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करून विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावनी निकम हिने केले, तर आभार प्रा. परमेश्वरी पवार यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. महेश रत्नपारखी, प्रा. स्नेहल सोनवणे, डॉ. शिवकुमार वरारकर तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 646402