spot_img
spot_img

चाळीस वर्षांचे वाळूचे राजकारण आता थांबवा -आमदार खताळ; पंचायत समितीत आढावा बैठक

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- ज्यांनी चाळीस वर्षे वाळूवर राजकारण केले, त्यांना आता घरकुलांसाठी वाळू मिळू नये, असे वाटत आहे. त्यांना राजकारण करू द्या. यापूर्वी आपण घरकुलांसाठी मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध करून दिली आहे. पुढील टप्प्यातही घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाईल,” असा टोला आमदार अमोल खताळ यांनी विरोधक  यांचे नाव न घेता लगावला.तालुक्यात सत्ताबदल झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरकुले सुरू आहेत, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.

संगमनेर पंचायत समिती येथे सोमवारी (दि. २१) झालेल्या आढावा बैठकीत आमदार खताळ बोलत होते. या बैठकीत शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, आरोग्य, कृषी, रोजगार हमी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, यांनी स्वागत करून प्रस्ताविक केले होते. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार खताळ म्हणाले, यापूर्वी घरकुले देताना अनेक ठिकाणी लाभार्थी निवडीत पक्षपात झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. ज्यांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे, असे अनेक नागरिक अद्यापही वंचित आहेत. ज्यांचे दोन मजली घर आहे, अशांनाही घरकुल मिळाल्याचे लोक मला येऊन सांगत आहेत. त्यामुळे यापुढे असे प्रकार होता कामा नयेत. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळेत सादर करणे गरजेचे आहे. तुमच्याकडून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले नाहीत, तर मला कारवाई करण्यास भाग पाडू नका. कारण आता हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. आतापर्यंत कागदावरच संगमनेर तालुका चालला; मात्र आता मी प्रत्यक्षपणे लक्ष घातले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनीही यापुढे आपल्या कामात गांभीर्य आणि पारदर्शकता ठेवावी. असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, आता काहीजण विनाकारण वातावरण तापविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वांनी लक्षात ठेवावे की, हे जनतेच्या हिताचे सरकार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संगमनेर तालुका टँकरमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका विकासाचे रोल मॉडेल बनवायचा आहे. अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिकांना कोणी त्रास देत असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आमदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. अशी ग्वाहीही आमदार खताळ यांनी दिली.

बैठकीत शिक्षण विभागातील प्रश्न, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, स्वच्छता, घरकुलांचे प्रस्ताव, आरोग्य सुविधा, कृषी विभागाची कामे, रोजगार हमी योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांवर विभागनिहाय चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची माहिती आमदार खताळ यांच्यासमोर मांडली.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सर्वप्रथम मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची संपूर्ण माहिती मांडली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!