spot_img
spot_img

अन्न भेसळीविरोधात कारवाई; २ लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा ):-अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच नियम व नियमन, २०११ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील मे. व्ही. एस. एकदंत फुड प्रॉडक्ट्स या आस्थापनेवर कारवाई केली. या कारवाईत कमी दर्जाच्या संशयावरून ‘काऊ घी’ या अन्नपदार्थाचा एकूण २ लाख ६० हजार ८२० रुपये किंमतीचा साठा जप्त** करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी मे. व्ही. एस. एकदंत फुड प्रॉडक्ट्स, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे अचानक तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अनुपालन होत नसल्याचे तसेच अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत संशय आढळून आल्याने ‘काऊ घी (जार)’ व ‘काऊ घी (१५ किलो टिन)’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन संबंधित साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये काऊ घी (जार) १७६ लिटर (१ लिटरचे १७६ जार), किंमत १ लाख ३५ हजार ५२० रुपये, तसेच काऊ घी (१५ किलो टिन) १७९ किलो (१५ किलोचे १२ टिन), किंमत १ लाख २५ हजार ३०० रुपये, असा एकूण २ लाख ६० हजार ८२० रुपये किंमतीचा साठा आहे.

जप्त साठ्यातून घेण्यात आलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी हे सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

दरम्यान, आष्टी, जि. बीड येथील दूध भेसळ प्रकरणात सहभाग आढळून आल्याने मे. भगवान कृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र, मु. पो. खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर (मालक – श्री. हरिदास एकनाथ गोपाळघरे) या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात दक्षता बाळगण्याचे आवाहन

सणासुदीच्या काळात अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वीटमार्ट तसेच इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी कमी दर्जाचे अथवा अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्नपदार्थ तयार करणे, साठवणे किंवा विक्री करणे टाळावे. तसेच बाहेरील राज्यांतून कमी दर्जाचे अन्नपदार्थ ट्रॅव्हल्स अथवा इतर वाहनांमधून अस्वच्छ पद्धतीने वाहतूक करून जिल्ह्यात आणू नयेत. अशा प्रकारचे प्रकार आढळून आल्यास संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीविरुद्धही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

अहिल्यानगर जिल्ह्यात अन्नपदार्थांच्या भेसळीबाबत संशय अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ-२, सो. ह. इंगळे यांनी केले आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!