spot_img
spot_img

अखेर बेग,जेधे, साबळे यांच्यावर मोक्काची कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या मंजुरीनंतर कलमवाढ

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गंभीर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चार आरोपींसह दोन विधीसंघर्षित बालकांवर मोक्काची कलमे लागू करण्यात आली आहेत.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, १११, ४९, २३८, ३(५) तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३, ७, २५ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या संघटित स्वरूपाच्या हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित गुन्ह्यात मोक्का कायद्यातील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) वाढविण्यात आली. त्यामुळे आरोपींविरोधातील कारवाई आता अधिक कठोर कायदेशीर चौकटीत होणार आहे.

मोक्का कारवाई झालेल्या आरोपींमध्ये विजय मुन्ना जेधे ऊर्फ गोरख जेधे (वय ३३, रा. काँग्रेस भवन शेजारी, डावखर रोड, वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर), मनोज संजय साबळे (रा. वॉर्ड क्रमांक ७, श्रीरामपूर), सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग (वय ४१, रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड क्रमांक ७, श्रीरामपूर), अंकुश रमेश जेधे (रा. काँग्रेस भवन शेजारी, वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर) तसेच दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा

शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मोक्का कायद्याचा वापर करून गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक पांडे आणि पोलीस कर्मचारी फिरोज पटेल यांनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!