spot_img
spot_img

भगवती माता मंदिर परिसर स्वच्छतेसाठी कोल्हारमध्ये भव्य स्वच्छता अभियान नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर चकाचक; ग्रामस्थ, व्यापारी, युवक, महिला व मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग ‘माझे गाव–माझी जबाबदारी’चा संदेश देत सामाजिक एकात्मतेचे दर्शन

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा) :- राहाता तालुक्यातील कोल्हारमध्ये  नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवती माता मंदिर व परिसर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कोल्हार बुद्रुक, ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी सकाळी ६.३० वाजता भव्य गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थ, व्यापारी, युवक, महिला तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘माझे गाव–माझी जबाबदारी’ आणि ‘स्वच्छ कोल्हार बुद्रुक–सुंदर कोल्हार बुद्रुक’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानात श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे संचालक अनिल पाटील खर्डे, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील खर्डे, कोल्हार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे, उपाध्यक्ष अतुल रांका व पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे पा.यांच्यासह नागरिकांनी हातात झाडू, फावडे, कचरा संकलनाच्या पिशव्या आदी साहित्य घेऊन उत्साहाने सहभाग नोंदविला. मंदिर परिसर, बाजारतळ, सोनगाव रस्ता तसेच परिसरातील विविध ठिकाणचा कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली.

या अभियानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोल्हारच्या सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. समीरभाई शेख व वसीमभाई तांबोळी यांनी भगवती माता मंदिरासमोरील दीपमाळ स्वतः हाताने घासून-पुसून स्वच्छ केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक परिसर, बी.एम. स्वीट्स परिसर तसेच एच.डी.एफ.सी. बँकेसमोरील ओपन जिम परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवण्यासाठी मागील रविवारी, दि. २७ सप्टेंबर रोजीही ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. सलगपणे राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेसोबतच सामाजिक एकोपा आणि ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित होत आहे.

विशेष करून नवरात्रोत्सव काळात भगवती माता मंदिरात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या अभियानातून प्रभावीपणे देण्यात आला.

मान्यवरांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी भाऊसाहेब शिंदे, शिवाजी उदावंत, डॉ. उद्धव काळोखे, गणेश रांधवणे, ॲड . संदीप खर्डे, तुषार बोऱ्हाडे, मोहित हिरानंदानी, महेश फलटणे, निलेश मोहाडकर, मुद्रा मेन्सचे संचालक प्रदीप खर्डे, संदीप कोरडे, डॉ. श्याम शिंदे, स्वप्नील मोरे,बाळासाहेब शेळके,गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रवींद्र शिंदे, विकी डंक, प्रसाद दळवी,महेश शेळके, सोनू सिंग, बी.एम. स्वीट्सचे संचालक भाना शेठ, निलेश शिंगवी, नवीन पटेल, पोलीस मित्र रामराजे गायकवाड, पत्रकार सुहास वैद्य,पत्रकार गणेश सोमवंशी, बापू दळवी, किरण तांबे यांच्यासह व्यापारी, युवक, महिला भगिनी, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!