spot_img
spot_img

‘नगरी-नगरी’ फिरा मुसाफिर…      घर का रस्ता भूल गया…!’           (भाग चार)

अध्यात्मिक किंवा धार्मिकतेतील श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर आपली गेल्या तीनचार लेखांपासून चर्चा चालू आहेच… अध्यात्म हा देवाचा शोध नसून आपला स्वतःचाच शोध असावा, असं माझं व्यक्तिगत मत आहे, कदाचित ते चुकीचंही असावं… बरं ज्यांना अध्यात्माच्या माध्यमातून अनेक विधी, पूजापाठ, मंत्रतंत्र आणि सिद्धीची साधना वापरून देवाचा शोध घ्यायचा होता, त्यांना तरी कधी देव भेटलाय…? आणि समजा एखाद्याला भेटलाच तरी त्याच्या शब्दावर कधी कोणी विश्वास ठेवलाय…?

‘मंजिल-मंजिल करती दुनियाँ,

मंजिल की कोई शय नहीं…

जिसको देखा चलते देखा,

पहुंचा तो कोई है नहीं…।’

म्हणूनच देवाचा तपास करीत धावपळ करण्यापेक्षा आपण आपलाच नीट तपास करावा… कुठेच काशी करायची गरज पडणार नाही, आपण आपलीच आहे ती काशी नीट करावी… तसं पाहिलं तर देवा वाचून तुमचं-आमचं काही खुटलेलं पण नाहीच, अन देवाला कोणी घाबरायलाही मोकळा नाहीच… आम्ही जातो आमच्या जखमांवर औषध लावण्यासाठी, पण जखम नेमकी कशामुळे झाली आहे, ते देवानं पाहिल्यावर तो औषध न लावता फक्त मीठच चोळत असतो… पण तरीही असावा कोणीतरी वेळ प्रसंगात आपल्याला एखादा जोडीदार, आणि कोणाचा तरी आधार… आणि म्हणूनच ही सगळी धावपळ असावी, नाही तर आपण देवाला कधी मोजत असतो…?

कितीही देव-देव करा, कितीही पूजापाठ करा, कितीही तीर्थयात्रा करा, पण माणसं आपला मुळ स्वभावच बदलायला तयार नसतात… आणि नेमका तेथेच घोटाळा होत असतो, आणि तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण असावं…

सकाळी-सकाळी तासभर पूजापाठ करीत बसलेलं म्हातारं शेवटच्या मिनिटाला अगरबत्ती पेटवायला काडेची पेटी जर जागेवर सापडली नाही तर अर्धा तास घरात तनफन करीत सगळ्या घरादाराला शिव्याच देत बसतंय…

घरापासून मंदिर किंवा तीर्थाचं जे अंतर आहे, तो प्रवास एवढा सोपा नाही जेवढा लोक समजतात… मंदिराच्या किंवा कुठल्याही तीर्थाच्या चार भिंतीच्या आत काहीच नसतं… तिथे फक्त एक जागृत स्कॅनिंग मशीन असतं… तेथे आपला ‘एक्स-रे’ निघत असतो, ब्रेन नॅपिंग होत असतं, एमआरआय होत असतो, नार्को टेस्ट होत असते… खऱ्या अर्थानं पाहिलं तर तेथे फक्त आपलं ऑडिटच होत असतं… त्यासाठीच आपली वैयक्तिक फाईल क्लिअर असावी लागते, तेव्हाच ईश्वराची खरी कृपा होऊ शकते… नाहीतर आपल्या चुकीच्या कर्मांची फाईल देवासमोर उघडली गेल्यावर आपण हातानं आपली फाडून घेत असतो, हेच चुकीच्या माणसांना कळत नाही… आणि म्हणूनच तर समाजातील अनेक माणसं देवाच्या नावानं कायमच रडत असतात…

‘आम्ही तर फार देवदेव करतो हो… आम्ही खूप चांगले आहोत, पण नेमकं आमच्याच बाबतीत असं का घडतंय, तेच कळत नाही…!’

तुमच्याच बाबतीत असं का घडतं ते तुला कधीच कळायचं नाही… कारण जे तुला जाणूनबुजून कळलं नव्हतं, ते देवाला अगोदरच कळलेलं होतं… आणि ‘आम्ही खूप चांगले आहोत’ हे सर्टिफिकेट तुला लोकांनी दिलंय की तुमचं तुम्हीच घरात छापून घेतलंय…?

आपण भौतिक जगात जगता-वागताना चुकीचे व्यवहार करायचे, लोकांना फसवायचं, दुसऱ्याची निंदाच करायची, कोणाचं चांगलं चाललं असल तर तिथे तेल ओतायचं… दुसऱ्यांचे घरं फोडायचे, मंथराचे आशीर्वाद घ्यायचे, आणि सुजल्यावर देवा पुढं जाऊन रडत बसायचं… हेच जगण्या-वागयातलं सूत्र माणसाला आजपर्यंत नीट समजलं नाही, अन म्हणून तर जगात दुःखं आहे… मग त्यात आपली व्यक्तिगत चूक असो की आपलं सगळं कुटुंबच हालकट असो… आपल्याला प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगायचेच आहेत… त्यातून कोणाचीच सुटका झालेली नाहीये…

 

‘ये सोचना गलत है कि,

हम पर नजर नहीं है…

मसरूफ़ हम बहुत है,

लेकिन बे-खबर नहीं है…।’

 

Sachidanand Shirdi…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!