सोनई( जनता आवाज वृत्तसेवा) :- शनि अमावस्येनिमित्त शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. देशभरातून आलेल्या सुमारे चार लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्था, वाहनतळ, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि हरवले-सापडले केंद्राचे नियोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळपासूनच शनिशिंगणापूर येथे भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर मुळा कारखाना गट कार्यालय परिसर, संभाजीनगर महामार्गावरील देवस्थानची जागा तसेच खासगी वाहनतळांवर वाहने उभी करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे लागले.
बॅरिकेटिंगमुळे दर्शन व्यवस्था सुरळीत
शनि अमावस्येच्या निमित्ताने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन देवस्थानने विशेष नियोजन केले होते. मंदिरातील मूर्तीसमोर बॅरिकेटिंग केल्याने भाविकांना रांगेतून सुलभ दर्शन घेता आले. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप उभारण्यात आले होते.
यंदा उन्हाची तीव्रता आणि दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षांच्या तुलनेत भाविकांची गर्दी काही प्रमाणात कमी असल्याचे दिसून आले.
मान्यवरांनी घेतले दर्शन
शनिवारी पहाटेची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाली. दुपारची आरती जयेश शहा, तर सायंकाळची आरती सौरभ बोरा यांच्या हस्ते पार पडली.
दिवसभरात पद्मश्री पोपटराव पवार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, खासदार ज्योती वाघमारे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन कुंकलोल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.
देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
नियोजनाचे भाविकांकडून कौतुक
प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली. दर्शन व्यवस्था, सुरक्षा आणि सुविधा याबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीही चांगला बंदोबस्त ठेवला.




Total Users : 662223