संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- आमच्या वाडीत अनधिकृत देशी दारूची विक्री सुरू आहे. वाडी-वस्तीवरील अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. या दारूमुळे आमचे संसार उघड्यावर पडत आहेत. घरातील कष्टाची कमाई दारूवर खर्च होत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. साहेब, तुम्ही आम्हाला दिवाळीचा आनंदाचा शिधा दिला आहे; मात्र अशा परिस्थितीत हा आनंदाचा शिधा आम्ही खायचा तरी कसा?” अशा शब्दांत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठारच्या गिऱ्हेवाडी येथील महिलांनी आमदार अमोल खताळ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.महिलांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी घारगाव पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर त्या तक्रारदार महिलांच्या समवेत स्वतः आमदार अमोल खताळ व घारगाव पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन जनावरांच्या कडबा चाऱ्याखाली एका महिला दारू विक्रेत्याने लपवून ठेवलेला देशी दारूचा साठा जप्त केला ,उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या दिवाळीचा शिधा ’चे वाटप हिवरगाव पठार गावांतर्गत येणाऱ्या गिऱ्हेवाडी, पायरवाडी आणि सुतारवाडी या आदिवासी वाडी-वस्ती मध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना आमदार खताळ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
त्या कार्यक्रमा प्रसंगी या वाडीतील महिलांनी अवैध दारूविक्रीचा प्रश्न आमदार खताळ यांच्या निदर्शनास आणून दिला. व साकूर पठार भागातील विविध वाडी -वस्त्यांवर देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कुटुंबातील पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याने घराची जबाबदारी महिलांवर पडत आहे. मुलांचे संगोपन, शिक्षण आणि घरखर्च भागविताना महिलांची ओढाताण होत आहे. कष्टाने कमावलेला पैसा घराच्या गरजांसाठी खर्च होण्या ऐवजी दारूवर खर्च होत असल्याने कुटुंबांपुढे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. या अवैध दारूविक्रीला आळा घालून महिलांचे संसार उद्ध्वस्त करणारा हा व्यवसाय कायमचा बंद करावा, अशी आर्त मागणी महिलांनी आमदार खताळ यांच्याकडे केली.
महिलांनी मांडलेल्या व्यथेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांसमवेत संबंधित ठिकाणी भेट दिली. घारगाव पोलिसांच्या उपस्थितीत जनावरांच्या चाऱ्यात लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या बाटल्यांचा साठा शोधून जप्त करण्यात आला आहे. यावेळी साकुर येथील मुख्य दारू विक्रेते शंकर खेमनर यांना आम्हाला हप्ता द्यावा लागत असल्याचे दारू विक्री करणाऱ्या महिलेने आमदार खताळ यांच्यासमोर सांगितले आमदार अमोल खताळ यांनी तातडीने केलेल्या या कारवाईचे गिऱ्हेवाडी, पायरवाडी व सुतारवाडी परिसरातील महिलांनी स्वागत केले.




Total Users : 675030