spot_img
spot_img

मस्ती आली की जनता नेत्यांना नीट घरी पाठवते! ‘घरी गेल्यावर गोधडी घ्यायची अन् रानात जायचं’; सुरेश धस यांचा राजकीय नेत्यांना टोला

कर्जत(जनता आवाज वृत्तसेवा):- आमदार असो, खासदार असो अथवा मंत्री; कोणालाही सत्तेची मस्ती आली की जनता त्याला योग्य जागा दाखवते. नीट घरी पाठवते आणि घरी गेल्यावर गोधडी घ्यायची अन् रानात जायचं, अशा शब्दांत भाजपचे आमदार तथा माजी मंत्री सुरेश धस यांनी राजकीय नेत्यांना जोरदार टोला लगावला. कर्जत येथे किरण पावणे यांच्या ‘साई विंडो’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. धस यांच्या फटकेबाज भाषणाने या कार्यक्रमाला राजकीय रंग चढला.

राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संदर्भ देत धस यांनी बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तींवर जोरदार प्रहार केला. संतोष देशमुख यांची हत्या जर पचवली गेली असती, तर बीड जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला जिवंत ठेवले नसते, असे ते म्हणाले. हत्या करणारे हे कोणत्याही एका समाजाचे प्रतिनिधी नाहीत. आपला कोणत्याही समाजाला विरोध नसून, समाजाच्या नावाखाली वावरणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा विरोध आहे. अशा प्रवृत्ती नष्ट करण्यासाठीच आपण पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या गुन्हेगारी प्रवृत्तींचे साम्राज्य विस्तारत कर्जत-जामखेड मतदारसंघातील दिघोळ गावापर्यंत पोहोचले होते, असा गंभीर आरोपही धस यांनी केला. परस्पर पदाधिकारी निवडणे, महत्त्वाच्या बाबी वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू न देणे, अशा प्रकारांमुळे राजकीय नेतृत्वाची कोंडी होते, असे सांगत त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचाही संदर्भ दिला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. पूर्वी ज्यांच्या मागे लोक फिरत होते, त्यांच्यावरच आता इतरांच्या मागे फिरण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

महानंदा दूध संस्थेचा उल्लेख करताना ही संस्था मोठी असून तिचे अस्तित्व टिकविणे आणि विस्तार करणे गरजेचे असल्याचे धस यांनी सांगितले. कोणताही नेता कार्यकर्त्यांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कार्यकर्ते असतील तरच नेता टिकतो, असा टोला लगावत त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय नेतृत्वालाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राजेंद्र गुंड, अशोक खेडकर, बाळासाहेब शिंदे, नगराध्यक्ष छाया शेलार, माजी नगराध्यक्षा उषा राऊत, नितीन धांडे, शहाजीराजे भोसले, किरण पाटील, नानासाहेब निकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साई विंडोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असला, तरी सुरेश धस यांच्या राजकीय फटकेबाजीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांच्या विधानांनंतर उपस्थितांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले. विशेषतः ‘मस्ती आली की जनता घरी पाठवते’ या विधानाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!