राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):-विजेचा खेळखंडोबा वेळीच थांबवा अन्यथा लवकरच महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली.
याबाबत पत्रकात तनपुरे यांनी म्हटले, की शहराच्या तसेच तालुक्याच्या अनेक भागांमध्ये महिनाभरापासून विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. त्यास शेतकरी व व्यापारी वर्ग वैतागला आहे, शासनाने शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीज देण्याची नुसती घोषणा केली; पण आज शेतकऱ्यांना दिवसभरात ४ ताससुद्धा वीज मिळेनाशी झाल्याने शेतकऱ्यांची पिके एकीकडे पाऊस नसल्याने वाया चालली आहेत. ती पिके विजेच्या धरसोडीने जळून चालली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना पाणी आहे, तर
वीज नाही, वीज आहे तर पाणी नाही, अशी अवस्था झाली आहे. शहरातसुद्धा कधी वीजपुरवठा खंडीत होईल याची भीती असल्याने व्यापारी, नागरिकसुद्धा वैतागले आहे. पहाटे, सकाळी शहरात नगरपालिकेचे पिण्याचे पाणी यायची वेळ व वीज आहे.
पुरवठा खंडीत होत असल्याने गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शेतीमध्ये असेच सुरु असल्याने जनावरांच्या पिण्याचे पाण्याची अडचण होत आहे. मुलांच्या परीक्षेचे दिवस आहेत. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी खासदार तनपुरे यांनी दिला



