पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरविले आहे. या प्रकरणातील शिक्षेचा निर्णय आज (ता. २५) जाहीर होणार आहे.
शिक्षेवरील सुनावणीदरम्यान आरोपीने “मी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो होतो. पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला,” असा दावा केला. मात्र, न्यायालयाने तपासातील पुराव्यांच्या आधारे त्याच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.
सरकारी पक्षाने आरोपीला पश्चात्ताप नसल्याचे सांगत मृत्यूदंडाची मागणी केली आहे. १ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे आता न्यायालयाच्या अंतिम शिक्षेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



