नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथे ब्रम्हलिन प्रल्हादगिरीजी महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने आयोजित रामायणकार समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून सलग सात दिवस चाललेल्या श्रीराम कथेची त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान प्रांगणात मंगळवारी दि.२९ ऑगस्ट रोजी रात्री मेणबत्त्या पेटवून उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.जीवन राममय बनण्यासाठी घराघरात प्रभू रामचंद्रांचे पूजन करा,जग फार मोठे आहे,गुंठयासाठी भावांनो एकमेकांशी भांडत बसू नका, रामायणात भोगाची नव्हे तर त्यागाची स्पर्धा दाखवली आहे म्हणून जीवन आदर्शमय बनण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा असे आवाहन समाधान महाराज शर्मा यांनी उपस्थित हजारो भाविकांना केले.
यावेळी झालेल्या कथा प्रसंगी रामकथाकार समाधान महाराज शर्मा यांनी शबरी भेट सेतू बांधणी,हनुमंतरायांचा अशोक वाटिकात प्रवेश,लक्ष्मणास बाण लागल्यानंतरचा प्रसंग,युद्धाचा प्रसंग कुंभकर्ण,रावण युद्धाचा प्रसंग,रावणाचा अंत लंकेवर विजय असे विविध प्रसंग सांगतांना त्यांनी उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले.लंकेहुन विजयश्री प्राप्त करून आल्यानंतरचा अयोध्यातील आनंदोत्सवाचा प्रसंग सांगत त्यांनी आदर्श जीवन जगण्यासाठी प्रभू श्रीराम चंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करा,संतांची संगत करा,जीवनात श्रीराम कथा आवडीने ऐका,मान अपमान सोडून वागण्याचा प्रयत्न करा,देवाचे गुणगान कपट सोडून करा,देवाच्या मंत्राचा श्रद्धेने जप करा,जेवढे मिळते तेवढ्यात संतोषाने जगण्याचा प्रयत्न करा,पाप मनात न ठेवता मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करा,भवसागरातून तारून जो भाव सागरात फिरतो तोच गुरू आपल्याला जीवनात तारत असल्याने गुरूंची सेवा निष्ठेने करा असा संदेश यावेळी बोलतांना दिला.
यावेळी झालेल्या कथा समाप्ती प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी समाधान महाराज शर्मा यांचे संतपूजन केले. असा सोहळा पुन्हा होण्यासाठी समाधान महाराज शर्मा यांनी पुन्हा येथे यावे अशी विनंती केली.तेव्हा मी पुन्हा येईन असे म्हटल्यावर उपस्थितांमधून हजारो टाळ्यांची लहर उसळली.यावेळी लाईट बंद करून मेणबत्या पेटविण्यात आल्या व प्रभू रामचंद्रांच्या महाआरतीने रामनामाचा जयघोष करत रामकथा सोहळयाची सांगता करण्यात आली.
कथा समाप्ती प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,भाजपचे राज्य प्रवक्ते नितीनभाऊ दिनकर यांच्यासह विदर्भ अकोला येथील भक्त मंडळ,महाराष्ट्राच्याकानाकोपऱ्यातून आलेल्या भक्त मंडळाच्या वतीने रामयण कथाकार महंत श्री समाधान महाराज शर्मा यांचे व सोहळा संयोजक महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले तर रामकथा प्रसंगी उत्कृष्ट संगीत साथ देणारे गायक वादक वृंद मंडळींचा यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.उपस्थित यजमानाच्या हस्ते सपत्नीक महाआरती झाल्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप पंचक्रोशीतील तरूण मंडळाचे कार्यकर्ते व भक्त मंडळाचे सेवेकरी यांच्या मार्फत करण्यात आले.



