कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ) :- चातक पक्षी पावसाळ्यात पावसाचेच पाणी पीत असतो. त्यामुळे त्याचे सर्व लक्ष आभाळाकडे लागलेले असते. त्याचप्रकारे भक्ताचे लक्ष केवळ भगवंत आणि भगवंताच्या चरणाकडे लागलेले असते. भक्ती करायची असेल तर तल्लीनतेने करावी आणि रडायचं असेल तर भगवंताकरिता रडावं. भगवंताकरिता रडणं हे गीत होत असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य महंत रामगिरी यांनी केले.
कोल्हार भगवतीपूर येथे बुधवारी श्रीमद् भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. भगवतीदेवी मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये दररोज रात्री ७ ते १० या वेळेत श्रीमद् भागवत कथा सुरू आहे. दिवसेंदिवस कथेसाठी भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दूर अंतरावरून भाविक येथे येऊन भक्तीरसात चिंब होतआहेत. वाद्यवृंदाच्या साथीने भजन आणि भक्तीगीतांच्या रसामध्ये महिला – पुरुष भाविक दंग होऊन नृत्य करीत आनंद घेत आहेत.
गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोकुळातील गोपी – गोपाळांना भगवान कृष्ण हे असामान्य असल्याची प्रचिती आली. भगवंताचे रूप असल्याचे त्यांना जाणवले. रासलीलेतील बासरीचे वर्णन करताना रामगिरी महाराज म्हणाले, भगवान कृष्णाच्या बासरीचा स्वर ऐकायला आल्याबरोबर गोपिका देहभान हरपून त्या दिशेने चालू लागायच्या. श्रीकृष्णाच्या गोपिका समवेतचे विकाररहित रासलीला वर्णन त्यांनी केले.
रामगिरी महाराज म्हणाले, आपल्या असंख्य राक्षसांचा वध झाल्यानंतर कंस चिंताक्रांत झाला. कंसाच्या सभेत नारद पोहचत त्याला देवकीचा आठवा पुत्र कृष्ण असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णाला इकडे मथुरेत बोलावून घ्यावे त्यासाठी अक्रूराला पाठवावे असा सल्ला ते कंसाला देतात. कंस कुटील हेतूने अक्रूराला मथुरेतून गोकुळात धनुररागाचे निमंत्रण देण्यासाठी पाठवतो. निमंत्रण स्वीकारून कृष्ण आणि बलराम मथुरेला जातात. तिथे धनुरयागात कृष्णाने धनुष्य उचलले आणि त्याचे तुकडे केले. कंसाच्या महालातील मैदानात महाकाय हत्तीला कृष्ण आणि बलरामाने ठार केले. चामुर आणि मुष्टीक नावाच्या दोन बलवान मल्लांबरोबर मल्लयुद्ध करीत त्यांना ठार करतात. लगेचच कंसाकडे कुच करीत कृष्णाने कंसाचे केस पकडून, त्याच्या छाताडावर बसून कंसाला ठार मारले. त्यानंतर उग्रसेनाला कंसाच्या बंदीवासातून मुक्त केले. तसेच १८ वर्षापासून कारागृहात बंदी असलेल्या वसुदेव – देवकीला कारागृहातून मुक्त करतात. तेथे नंदराजा आल्यावर त्याला कळते की, कृष्ण हा त्यांचा पुत्र नसून वसुदेव – देवकीचा मुलगा आहे.
भगवान कृष्ण संदिपन ऋषींच्या आश्रमात विद्यार्जन करतात. जरासंध १७ वेळा मथुरेवर स्वारी करतो. त्यानंतर भगवंताने द्वारका नगरी निर्माण केली. बलरामाचा रेवतीशी विवाह झाला हे सांगत रामगिरी महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर प्रसंगाचे वर्णन केले. ते म्हणाले, विदर्भ नगरीचा राजा रुक्मि याने त्याची बहीण रुक्मिणीचा विवाह शिशुपालासंगे ठरविला होता. मात्र रुक्मिणीला श्रीकृष्ण भगवान प्रिय होते. ती श्रीकृष्णाला पत्र पाठवते. त्यात ती श्रीकृष्णाशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित करीत तिचे हरण करावयास सांगते. द्वारकेतून कृष्ण – बलराम स्वयंवराला जातात. ठरल्याप्रमाणे देवीच्या दर्शनाला गेलेली रुक्मिणीचे श्रीकृष्ण हरण करतात. त्यानंतर शिशुपाल आणि जरासंध यांच्यासंगे कृष्ण युद्ध करून त्यांना पराजित करतात. द्वारकेत रुक्मिणी स्वयंवराची जोरदार तयारी केली जाते. यावेळी रुक्मिणी स्वयंवराचा प्रत्यक्ष जिवंत देखावा सादर करण्यात आला. कृष्ण भगवान आणि रुक्मिणीची वेशभूषा करण्यात आली. मंगलाष्टके म्हणून विधिवत स्वयंवर साकारण्यात आले. कथेदरम्यान वृंदावनचे कृष्णाजी महाराज यांनी मोराची वेशभूषा करीत सवाद मयूरनृत्य सादर केले. भाविकांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.
२०१४ नंतर परिसरात प्रथमच एवढा मोठा सोहळा : डॉ. विखे पा.
कथेदरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत रामगिरी महाराज यांचे पूजन केले. याप्रसंगी डॉ. विखे पा. म्हणाले, २०१४ साली बाभळेश्वर येथे झालेल्या भागवत कथेनंतर एवढ्या मोठ्या स्वरूपात कोल्हार भगवतीपूरमध्ये हा सोहळा होत आहे. कोल्हार भगवतीपूरमध्ये एवढी गर्दी यापूर्वी मी पाहिली नाही. याचा अर्थ हे गाव आता धार्मिकतेकडे वळाले आहे. मी एवढ्या वर्षापासून प्रयत्न करूनही जे शक्य झालं नाही, ते रामगिरी महाराजांनी शक्य करून दाखविले. अधिक मास आणि श्रावण मास एकत्र आल्याने ही पर्वणी साधण्यासाठी मतदारसंघातील माता – भगिनींना तुळजापूर आणि पंढरपूरला आम्ही नेत आहोत. या महिला जेव्हा पंढरपूरला पोहचतील तेव्हा चंद्रभागेच्या तीरावर रामगिरी महाराजांनी कीर्तन करावे अशी विनंती त्यांनी केली. महाराजांचा एवढा व्यस्त दिनक्रम असतानाही प्रवरा परिसरातील कार्यक्रमाचे निमंत्रण ते आवर्जून स्वीकारतात याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.



