लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):-
नगर, सोलापूर, खांन्देश या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.शेतकऱ्यांची पहिली पेरणी वाया गेली असली तरी, दुबार पेरणीसाठी शेतक-यांना मदत करण्याच्या दृष्टीने सरकार नियोजन करत असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकरांशी बोलताना स्पष्ट केले.
महसूलमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की,पाऊस व्हावा अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनि पेरण्या केल्या आहेत. त्या अडचणीत सापडल्या असून उतरून पडलेली पिके पावसवाचून करपून गेली आहेत. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी साठी मदत करण्याची सरकारची भूमिका आहे.तसेच बोगस बियाणे तसेच खतांचे लिंकेज बाबत येणा-या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेवून यामध्ये आता प्रचलित कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कृषि मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समितीही नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांची निवड झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले. जिल्ह्यामध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांना राजकीय पार्श्वभूमीही असल्याने पक्ष संघटनेचे काम ते अधिक जोमाने पुढे घेवून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री म्हणून अजीत पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने सरकारच्या निर्णय प्रक्रीयेला अधिक गती प्राप्त झाली असून, मागील अडीच वर्षात ठप्प झालेली विकासाची प्रक्रीया अधिक वेगाने पुढे जाण्यास मदतच झाली आहे. आमचा संसार आता उत्तम चालला असल्याची कोटी त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली



