अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा ) : – अहमदनगर जिल्ह्यात तालुका स्तरावर मतदान सहायता केंद्रात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १५ निवडणुक संगणक चालक गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या १२ हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. या मानधनात वाढ व्हावी व पुणे जिल्ह्यातील निवडणुक संगणक चालकांप्रमाणे २४ हजार रुपये महिन्याला मानधन मिळावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील निवडणुक संगणक चालकांच्या वतीने जिल्हा निवडणुक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, तहसील कार्यालय अंतर्गत निवडणुक शाखेत मतदार नोंदणी विषयी नमुना ६, ७, ८ ची डाटा एंट्री वेळेत पुर्ण करणे, दैनंदिन अहवाल तयार करणे, गुगलशीट भरणे, पदवीधर, शिक्षक मतदार डाटा एंट्री करणे, मतदार ओळखपत्रांची बुकिंग करणे, बी.एल.ओ यांच्याशी समन्वय ठेवणे, ऑनलाईन तक्रारी निर्गत करणे इत्यादी निवडणुक अनुषंगिक कामे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नित्यनेमाने पार पाडत आहोत. सद्य स्थितीत या कामाचे दरमहा फक्त १२ हजार रुपये इतके मानधन मिळते. परंतु सदरचे मानधन हे महागाईचा व कामाचा विचार करता अत्यंत तुटपुंजे असे आहे. या महागाईच्या काळात पुरेसे मानधन नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे फार कठीण होत आहे. त्यामुळे उपासमारीची ही वेळ आली आहे. तरी शेजारील पुणे जिल्ह्यातील निवडणुक संगणक चालकांप्रमाणे दरमहा मानधन मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी रोहन नोमुल, रोहित खापरे, प्रमोद वाघमारे, दिपाली औटी, आकाश माने, सागर गरुड, विनय कावळे, ज्योती आव्हाड, चंद्रकांत कहार, प्रदीप जत्ती, विशाल पाबळ, निलेश अडाले, अजय खंडीझोड, इरफान शेख, संदीप पाळंदे हे निवडणुक संगणक चालक उपस्थित होते.



