कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव शहर तालुक्यातील धोत्रे, खोपडी परिसरात बुधवारी (५ जुलै) झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. प्रशासनाने धोत्रे, खोपडी व परिसरातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदारांकडे केली.
धोत्रे, खोपडी व परिसरातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा – माजी आ.स्नेहलता कोल्हे यांची तहसीलदाराकडे मागणी
५ जुलै रोजी सायंकाळी धोत्रे, खोपडी व परिसरात जोरदार पाऊस झाला. या धुवाधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात नुकतीच पेरणी केलेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. शेतातील उभ्या पिकांचे या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. सलग अडीच ते तीन तास कोसळलेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली, त्याशिवाय अनेक लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. अनेक लोकांचे संसार उद््ध्वस्त झाल्यामुळे ते उघड्यावर आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा धोत्रे, खोपडी व परिसरातील इतर काही गावांना तडाखा बसला. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. तसेच समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले.
दरवर्षी पावसाळ्यात समृद्धी महामार्गावर पाणी साचते. हे पाणी महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे नुकसान होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने व संबंधित विभागाने या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली आहे. यावर्षी समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली.




Total Users : 631129