पंढरपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेले ते दोघे… वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने त्यांच्या संसारावर घाला घातला. शेतातील पंपाची वीज बंद करताना पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच पत्नी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धावली; मात्र नियतीने तिलाही सोडले नाही. काही क्षणांच्या अंतराने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात सोमवारी पहाटे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करून वडाची पूजा करण्याची तयारी करणाऱ्या अलका नागणे यांनाच काही तासांत पतीसोबत जगाचा निरोप घ्यावा लागला. या दुर्दैवी योगायोगाने नागणे कुटुंबासह संपूर्ण गाव हळहळून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेपासून परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. नेहमीप्रमाणे नागणे दाम्पत्य शेतातील कामासाठी गेले होते. पहाटे पाचच्या सुमारास शेतातील पाण्याच्या पंपाची वीज बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे विहिरीजवळ गेले. पावसामुळे परिसर ओला असल्याने मोटार बंद करत असतानाच त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
पतीला तडफडताना पाहून अलका नागणे यांना स्वतःचा जीव आठवला नाही. संसाराचा आधार हातातून निसटत असल्याचे पाहून त्या त्यांना वाचवण्यासाठी धावत गेल्या. मात्र विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की त्या देखील त्याच्या विळख्यात सापडल्या. काही क्षणांतच दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ देणारे हे दाम्पत्य मृत्यूच्याही क्षणी एकमेकांना सोडून गेले नाही. ज्या दिवशी अलका नागणे या वडाची पूजा करून पतीच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करणार होत्या, त्याच दिवशी त्यांच्या कुंकवाचा आधार कायमचा हिरावला गेला. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू उभे केले.
एकाच वेळी पती-पत्नीची अंत्ययात्रा निघणार असल्याने आंबे गावावर शोककळा पसरली आहे. नागणे दाम्पत्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वडाची पूजा राहिली अपुरी…
दरवर्षीप्रमाणे यंदाही वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्याचा अलका नागणे यांचा संकल्प होता. मात्र, नियतीने असा घाला घातला की पूजा अपुरीच राहिली आणि ज्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची होती, त्यांच्यासोबतच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. या करुण योगायोगाने संपूर्ण पंढरपूर तालुका हळहळून गेला आहे.



