कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):- आज अहमदनगर जिल्ह्यात उद्योग व्यवसायांचे विस्तारीकरण होत आहे. काकडी विमानतळाचे विस्तारीकरण असो शिर्डी येथे ५०० एकरात एमआयडीसी असो अथवा नगर एमआयडीसीचे विस्तारीकरण असो या आणि यासारख्या अन्य विविध प्रकल्पांना पाठबळ देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे प्रतिपादन महसूल, पशु संवर्धन, दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
गुरुवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन, निळवंडे धरणाचे लोकार्पण, शेतकऱ्यांना नमो किसानचे वितरण तसेच अन्य कामांचा व योजनांचा ऑनलाईन शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूर येथे दिपक मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक घेतली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या कार्यक्रमप्रसंगी साधारणतः ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ होत आहे. जिल्ह्यातून एक लाख लोक येतील. या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. गेल्या ३० – ४० वर्षांपासून निळवंडे धरणाचे पाणी मिळावे म्हणून प्रतीक्षा होती. आता कालव्यांची चाचणी होऊन संकल्पपूर्ती झाली. मोदी यांच्याहस्ते या धरणाचे लोकार्पण होणार आहे. काकडी विमानतळाचे विस्तारीकरण व शिर्डी येथे एमआयडीसी झाल्यानंतर भविष्यात ७ ते ८ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वात स्थैर्य आहे. त्यामुळे उद्योगांच्या विस्तारीकरणाला मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, प. विखे कारखान्याचे उपाध्यक्ष सतीष ससाणे, कारखान्याचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब कडू विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खर्डे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक आसावा यांनी मानले.
भगवतीमातेच्या दर्शनाने समाधान वाटले : ना. विखे नियोजन बैठकीपूर्वी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमातेचे दर्शन घेतले. नवरात्रीनिमित्ताने अष्टमीच्या दिवशी दर्शन घेतल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, खजिनदार डॉ. भास्करराव खर्डे आणि विश्वस्तांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.




Total Users : 632404