श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- एस.टी. कर्मचार्याच्या नेतृत्वाखाली बसस्थानकावरच महिलांचे दागिने लांबविणार्या बीड जिल्ह्यातील महिलांच्या टोळी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले. आरोपींच्या वाहनाला लटकून शहर पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल ही कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून वाहनासह १७ लाख ७७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमला जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी ही माहिती दिली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपाधिक्षक डाॅ.बसवराज शिवपुजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी आदी उपस्थित होते. आसराबाई उर्फ लक्ष्मी ऊर्फ आशाबाई तुकाराम पवार (वय ५५, रा.बार्शी नाका, जि.बीड), सुनिता योगेश जाधव (वय २५, गांधीनगर, नाळवंडी नाका, मोहटा देवी मंदिराजवळ, ता.जि.बीड), वसंत विश्वानाथ मुंजाळ (वय ३८, धंदा मेकॅनिक, एस.टी. आगार बीड, रा.हिरापूर ता.गेवराई जि.बीड सध्या एस.टी.कॉलनी बीड), जुबेर रज्जाक पठाण (वय २९, धंदा चालक, रा.मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता.जि.बीड), कैशल्या सर्जेराव गायकवाड (वय ५२, रा.नाळवंडी नाका, जि.बीड), कमल विठ्ठल जाधव (वय ५३, रा.नाळवंडी नाका, खडी मशीनजवळ, बीड), सखुबाई सखाराम कुर्हाडे (वय ४०, रा.माऊलीनगर गेवराई, जि.बीड), गवळण पांडुरंग गायकवाड (वय ३५, रा.उकंडा, ता.पाटोदा, जि.बीड), शालनबाई लक्ष्मण जाधव (वय ५५, रा.नाळवंडी, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना ओला यांनी सांगितले की, धनश्री हंबीरराव सरनौबत (रा.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) या खोकर येथील त्यांच्या मैत्रिणीस भेटून त्या राहुरी येथे जाण्यासाठी २२ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास श्रीरामपूर बस स्थानकावर आल्या. श्रीरामपूर-पुणे बसमध्ये चढत असताना दरवाज्यात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात व्यक्तीने त्याच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरीला गेले. याप्रकरणीशहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरीक्षक गवळी यांनी तात्काळ तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेत असतांना तपास पथकास सदरच्या गुन्ह्यामध्ये एक महिंद्रा स्कॉपीओ गाडी (क्र.एमएच १२ जीएफ ५६३७) या गाडीचा वापर झाल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. सदर आरोपीचा व वाहनाचा शोध घेत असतांना ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी व त्यामध्ये श्रीरामपूर बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारी टोळी श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तात्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली. नेवासेकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणीदरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी नेवासेकडून येताना दिसली. तिला हाताने इशारा करुन थांबवण्यास सांगितले असता वाहनाचा वेग कमी होताच तीन कर्मचारी वाहनाल लटकले. यानंतरही वाहन चालकाने वाहन न थाबंवता तसेच श्रीरामपूरच्या दिशेने नेले असता ते केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर पकडले.
चौकशीदरम्यान या टोळीकडे सदर गुन्ह्याची कबुली दिली. अटक कालावधीत आरोपीजवळ श्रीरामपूर बसस्थानकावर व इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील आठ व शेवगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा १३४.२३ ग्रॅम व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील ३ लाख ३७ हदार रूपये किमतीचे ६७.४० ग्रॅम असा एकूम ७ लाख ७७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० लाख रूपये किमतीची महिंद्रा स्कॉपीओ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



