श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- येथील निपाणी वडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम नाही. सरपंच सौ. वनिता संजय राऊत यांची ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दुसऱ्या टप्प्यात सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांना बारा महिन्यांचा कालावधी देण्याचे ठरले होते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्व सदस्यांच्या समन्वय बैठकीत राजीनामा देण्याची विनंती सौ. राऊत यांना करण्यात आली होती. त्यावर सौ. राऊत यांनी चालढकल करत सुमारे सतरा महिने पद सोडले नाही. तद्नंतर सरपंच सौ. वनिता राऊत यांनी राजीनामाचा अर्ज गुरुवार (ता. १५ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा मंजुरीसाठी दिला. या अर्जावर साक्षीदार म्हणून उपसरपंच सौ. सारिका विलास जाधव आणि सदस्य सौ. सविता योगेश देवकर यांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी ग्रामसेवक प्रशांत दर्शने, पोलीस पाटील संजय गायधने, दत्तात्रय गोराणे, संतोष राऊत उपस्थित होते.
गटविकास अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम २९ (१) पोटकलम (१) अन्वये राजीनामा मिळाल्यावर सात दिवसाच्या आत सचिवाकडे अग्रेषित करील आणि सचिव सभेपुढे तो ठेवील. असे असताना राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविल्यानंतर गुरुवार (ता. २९ फेब्रुवारी) रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सौ.राऊत यांचा राजीनामा सदस्यांसमोर न मांडता सभा संपन्न झाली.
राजीनाम्याबाबत सचिव प्रशांत दर्शने यांच्याकडे विचारणा केली असता म्हटले कि, सरपंच विशेष सभा बोलावून पडताळणी करेल. याबाबतचे सर्व अधिकार हे सरपंच यांना आहे.
सत्ताधाऱ्यांचे भूमिकेकडे लक्ष
सरपंचपदाच्या राजीनाम्यानंतर आता मा. आमदार भानुदास मुरकुटे यांचे भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गावातील राजकीय समिकरणे बदलणार की काय ? याशिवाय सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी प्रयत्नशील असलेल्यांचीही चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.



