spot_img
spot_img

पतीने केला पत्नीवर चाकूने वार कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल; कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील घटना

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- तुमच्या सोबत नांदावयास येणार नाही, म्हणताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना तालुक्यातील चासनळी येथे घडली. पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी संगीता सुभाष सोनवणे (वय २२) हिचे लग्न नांदगाव तालुक्यातील सोयेगाव येथील सुभाष हिरामण सोनवणे यांच्यासोबत झालेले आहे. परंतु संगीता सध्या चासनळी येथे मामा अण्णा वामन बर्डे यांच्या घरी राहते.

दि. ११ जुलै रोजी सुभाष सोनवणे पत्नी संगीताला सोयेगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला. रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्याने पत्नीला सासरी चल म्हणाला, त्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकूने वार केले.

गळ्यावर वार केल्याने संगीता जखमी झाली. त्यानंतर सुभाषने स्वतःच्या गळ्यावरही वार करून घेतले. दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी अण्णा वामन बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात सुभाष सोनवणे विरुद्ध बी.एन.एस. २०२३चे कलम १०९ (१) ३५२, २५१, (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!