संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- इंटरनेट आधारित समूह माध्यमाच्या युगात विद्यार्थी सामाजिक आणि मानवतवादी मूल्यांपासून दूर जाऊ लागले असताना स्काऊट-गाईड या अतिरिक्त शैक्षणिक अभ्यासक्रमाचे पुनरुज्जीवन होणे ही काळाची गरज आहे. स्काऊट-गाईडच्या माध्यमातून आदर्श नागरिक आणि सक्षम राष्ट्र घडेल असा विश्वास सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.
सह्याद्री संस्था आणि माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्था यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या एक दिवसीय स्काऊट प्राशिक्षण शिबिरात ते बोलत होते. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित शाळांमधील ४० शिक्षक-शिक्षिका यात सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या सर्व २८ शाळा आणि महाविद्यालयांमधून स्काऊट उपक्रम नव्या जोमाने सुरु करण्यात आला आहे. एक दिवसीय कार्यशाळा ही त्याची सुरुवात आहे.
आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे रजिस्ट्रार बाबुराव गवांदे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि शारिरिक सुदृढता वाढीस लावण्यासाठी स्काऊट आवश्यक आहे.
संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर म्हणाले, आदर्श नागरिक आणि सुदृढ समाज घडविण्याचे कार्य शिक्षक वर्षानुवर्षे करत आले आहेत. बदलत्या काळात विद्यार्थ्यांना वळण शिक्षा करण्यावर निर्बंध आले आहेत.
चार सत्रांच्या या शिबिराची सुरुवात रत्नाकर पगारे गुरुजी यांनी केली. दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळविलेले, ८५ वर्षांचे पगारे गुरुजी ज्ञानमाता शाळेतील स्काऊटचे प्रमुख आणि माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत.
दुसऱ्या सत्रात संस्थेचे सचिव हवाई दल आणि मुंबई पोलीस विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत राहिलेले नारायण उगले यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत आरोग्य आणि स्वच्छता बिंबविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावायाच्या धड्यांचे प्रात्यक्षिक दाखविले.
तिसऱ्या सत्रात संस्थेचे उपसचिव दिगंबर बंदावणे यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करणे हे शिक्षकांनी आपले आद्य कर्तव्य मानावे असे निक्षून सांगितले.
चौथ्या सत्रात संस्थेचे समन्वयक रावसाहेब पारासूर यांनी समाजातील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्यात स्काऊट कसे योगदान देते यांचे स्पष्टीकरण केले.



