कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात अवतरण सोहळा उत्साहात पार पडला.
कोल्हार येथील बेलापूर रोड स्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयांमध्ये पहाटे ब्रह्म मुहूर्तापासूनच अवतरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे चार ते पाचच्या दरम्यान सामूहिक मेडिटेशन करण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत सकाळी 7 ते 8.15 मुरली क्लास झाला. त्यानंतर 8.15 ते 8.30 भोग लावण्यात आला व 9 वाजता कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शिव ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हार येथील व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, संपतराव खर्डे पाटील विद्यालयाचे संस्थापक राजयोगी शिवाजी भाई जी (आप्पा) कोल्हार सेंटरच्या संचालिका स्वाती बहेनजी, सोनगाव सेंटरच्या संचालिका पद्मा बहेनजी तसेच मोठ्या संख्येने राजयोगी भाई बहन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पद्मा दिदींचे अमूल्य असे मार्गदर्शन झाले. यामध्ये त्यांनी महाशिवरात्रीचे पावन पर्व संपूर्ण सृष्टीचे रचियेता सर्व आत्म्यांचे परमपिता निराकार परमात्मा शिव यांचे भारतामध्ये अवतरणाचे प्रतीक असल्याचे सांगितले.
हा दिवस आध्यात्मिक प्रेम आणि सद्भावना जागृत करण्याचा शुभ दिन आहे. आपल्या परमपित्याकडून अविनाशी सुख शांतीचा वारसा प्राप्त करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
पद्मा बहेनजींच्या विचाराचा धागा पकडत अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी कोल्हारचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय हे एक प्रकारे परिवर्तनाचे केंद्र असल्याचे नमूद केले. येथे सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा करताना त्यांनी विद्यालयाचे संस्थापक श्री शिवाजी भाईजी (आप्पा) यांचे विशेष कौतुक केले. हे सेंटर म्हणजे आप्पांनी सातत्यपूर्ण केलेल्या कठोर परिश्रमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच दिवसांचा विनामूल्य असलेला फाउंडेशन कोर्स करण्याचा प्रयत्न मी स्वतः करणार असल्याचे त्यांनी नमूद करून सर्वांनी हा कोर्स करावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसादाची वाटप करण्यात आले.




Total Users : 624402