spot_img
spot_img

खर्डा येथे मध्यरात्री भीषण आग; गाईचा गोठा जळून खाक, बैल जखमी

खर्डा(जनता आवाज वृत्तसेवा) :-  येथील चांभारवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत गाईचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत शेतकरी गोरख दत्तात्रय लोखंडे व सुरेश लोखंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून एका बैलाला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक गोठ्यात आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने काही क्षणातच संपूर्ण गोठा आगीत भस्मसात झाला. या आगीत गोठ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

या घटनेत गोठ्यात बांधलेला एक बैल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गोठ्याजवळ उभी असलेली मोटारसायकल आणि इतर शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील आगीत जळून नष्ट झाले. जनावरांसाठी साठवून ठेवलेले खाद्य, चारा आणि इतर आवश्यक सामग्री पूर्णपणे जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा इतर कारणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला कळविले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट झाल्याने चांभारवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!