नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):-आज लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नाशिक शहरातील ‘शिवनेरी’ शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत महिला आरक्षणाच्या संदर्भात संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले कि , याआधी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी स्पष्टपणे मांडणी केली होती की, या आरक्षणामध्ये सर्व समाजघटकांना समान संधी मिळाली पाहिजे. २०२४ च्या निवडणुकांनंतर तात्काळ जातीनिहाय जनगणना केली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही जनगणना झालेली नाही. उलट, जनगणनेला प्राधान्य न देता सध्या डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, ही गंभीर बाब आहे.
महिला आरक्षणाला काँग्रेस पक्षाने आणि विरोधी पक्षांनी कधीही विरोध केलेला नाही. मात्र, डिलिमिटेशन प्रक्रियेला आमचा ठाम विरोध आहे. २०२३ मध्ये ज्या पद्धतीने महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला, त्याच पद्धतीने पारदर्शक आणि न्याय्य अंमलबजावणी व्हावी, ही आमची भूमिका आहे.
महिला आरक्षणाची संकल्पना राजीव गांधी पंतप्रधान असताना मांडण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन त्यांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम करण्यात आले. महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांच्या हक्कांना बळ मिळावे यासाठी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
यापुढेही महिला सबलीकरणासाठी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष पूर्णपणे कटिबद्ध राहतील, अशी ग्वाही यावेळी दिली.



