spot_img
spot_img

कल्पना खरात  हिचा अटकपूर्व जामीन अर्ज राहाता न्यायालयाने केला नामंजूर

राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या चर्चेत असलेल्या अशोक खरात  प्रकरणातील महत्त्वाची दुवा मानली जाणारी त्याची पत्नी कल्पना खरात  हिचा अटकपूर्व जामीन  अर्ज राहाता न्यायालयाने आज नामंजूर केला  आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत खरात कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, आता कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती आणि संशयास्पद व्यवहारांचा डोंगर पाहता न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला.

सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी कल्पना खरातचा  या गुन्ह्यातील थेट सहभाग असल्याचे पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडले. तपास अधिकार्‍यांच्या अहवालानुसार, कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय नसताना कल्पना खरात यांच्या बँक खात्यात तब्बल ७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम आली कुठून? असा सवाल सरकारी पक्षाने उपस्थित केला. तसेच ५७ जमिनींच्या व्यवहारांपैकी ४० टक्के जमिनींच्या ७/१२ उतार्‍यावर कल्पना खरात यांचे नाव असणे आणि खरेदीखत प्रक्रियेत त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असणे, हे त्या या संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा भाग असल्याचे सिद्ध करते, असा दावा फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आला.

दुसरीकडे कल्पना खरात यांच्यावतीने वकील प्रशांत गिरी यांनी बाजू मांडताना हा प्रकार मीडिया ट्रायल असल्याचा आरोप केला. पती अशोक खरात  यांनी केलेल्या कृत्यांत पत्नीचा सहभाग नाही. केवळ पतीच्या सांगण्यावरून त्यांनी काही आर्थिक ट्रान्स्फर केले. त्यामागील हेतू त्यांना माहित नव्हता, असा बचाव त्यांनी केला. तसेच पती तुरुंगात असल्याने १८ वर्षांचा मुलगा आणि मुलीची जबाबदारी माझ्यावर आहे, मी कुठेही पळून जाणार नाही, असा भावनिक युक्तिवाद करत जामिनाची मागणी करण्यात आली. मात्र आर्थिक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला नाही.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपला निकाल जाहीर केला. जामीन अर्ज फेटाळला गेल्याने आता कल्पना खरात यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!