श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- दत्तनगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शमशाद मुसाभाई बागवान (वय ५२, रा. कुकुलोळ प्लॉटिंग, दत्तनगर, ता. श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे पती मुसाभाई हसन बागवान हे चालक म्हणून काम करत होते. त्यांचे दत्तनगर परिसरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते.
१ मे रोजी सायंकाळी नातेवाईकांनी घरी येऊन मुसाभाई यांना समज दिल्यानंतर रात्री सुमारे १०.४५ वाजता पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी मुसाभाई यांनी मुलगा अश्पाक याला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात अश्पाक याने घरातील किचनमधून चाकू आणून वडिलांच्या छाती, हात व पाठीवर वार केले. या हल्ल्यात मुसाभाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
घटनेनंतर जखमी अवस्थेत मुसाभाई यांना साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी शमशाद बागवान यांच्या फिर्यादीवरून मुलगा अश्पाक मुसाभाई बागवान याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.




Total Users : 614443