लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी सुमारे ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यानुसार २.३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. पीक विमा योजनेत अधिसूचित केलेल्या पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादी कारणांनी नुकसान झाल्यास, पीक कापणी प्रयोगावर आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाई देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे.
“जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असून, तालुका निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे: – नगर तालुका: ५ कोटी ३ लाख, अकोले: १ कोटी १७ लाख, जामखेड: १७ कोटी ७१ लाख, कर्जत: ८९ हजार, कोपरगाव: ९ कोटी ६६ लाख, नेवासा: २२ कोटी ६८ लाख, पारनेर: २१ कोटी ७२ लाख, पाथर्डी: १ कोटी ४० लाख, राहाता: १३ कोटी ९२ लाख, राहुरी: ६ कोटी २४ लाख, शेवगाव: १ कोटी ७ लाख, आणि श्रीरामपूर: १७ कोटी ९६ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने समन्वयाने पीक कापणी प्रयोगाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी केल्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. काही तालुक्यांतील भरपाईबाबतची परिगणना अद्याप प्रगतीपथावर असून, कापूस व कांदा पिकांच्या नुकसान भरपाईबाबतही प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.”




Total Users : 614443