श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरसगाव शिवारात उघडकीस आली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्यानंतर कारखान्यात डांबून मारहाण करण्यात आली, अशी तक्रार जखमी शेतकरी पांडुरंग भास्कर गवारे (वय ४८) यांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवारे हे शिरसगाव (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. त्यांच्या सावत्र भावासोबत शेतीच्या वाटपावरून न्यायालयात वाद सुरू आहे. दरम्यान, ३० एप्रिल रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास गवारे हे त्यांच्या गट क्रमांक ६२/१ मधील आंब्याच्या बागेत काम करत असताना आरोपी रोहित दिनकर यादव व त्याच्या साथीदारांनी चारचाकी वाहनातून तेथे येत ‘वाद मिटवण्यासाठी चला’ असे सांगून त्यांच्याजवळ संपर्क साधला.
यानंतर रोहित यादव याने गवारे यांच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावत जबरदस्तीने वाहनात बसवले. श्रीरामपूरच्या दिशेने नेत असताना वाहनातच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पुढे त्यांना खंडाळा एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात नेऊन पत्र्याच्या खोलीत डांबण्यात आले.
तेथे आरोपी दिनकर यादव, आप्पासाहेब गवारे व इतरांनी गवारे यांचे हातपाय बांधून लाकडी दांडे, लोखंडी गज आणि बेल्टने बेदम मारहाण केली. ‘जमिनीवरील दावा मागे घे, नाहीतर जीव घेऊ,’ अशी धमकी देण्यात आली. तसेच गळा आवळून ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलांनीही शिवीगाळ करत मारहाणीत सहभाग घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गंभीर जखमी अवस्थेत गवारे यांना त्यांच्या राहत्या परिसरात रस्त्यावर फेकून देण्यात आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात व नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रोहित दिनकर यादव, दिनकर माधव यादव, आप्पासाहेब भास्कर गवारे, प्रमिला भास्कर गवारे, शितल गवारे व इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



