राहाता(जनता आवाज वृत्तसेवा): – राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील निळवंडे कॅनॉल परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणात अटक आरोपी डॉ. राहुल आबासाहेब भनगे (३४) व अभिजीत दिलीप भुसाळ (३०) यांची पोलीस कोठडी न्यायालयाने ८ मेपर्यंत वाढवली आहे. पुढील तपासासाठी कोठडीची गरज असल्याचे नमूद करत पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली.
दि. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा पिंपरी निर्मळ शिवारातील शेत गट क्रमांक ३८७ मधील एका खोलीत हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता विना नोंदणीकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे उघड झाले. कायद्याने बंदी असतानाही महिलांना विविध ठिकाणांहून वाहनांद्वारे आणून ही तपासणी करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात आकाश रामराव नवले याच्यासह इतर आरोपींवरही गुन्हा दाखल असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आरोपींनी शेतमालकाची परवानगी न घेता खोलीचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले सोनोग्राफी यंत्र, त्याचा पुरवठा करणारे व्यक्ती, तसेच आरोपींचे इतर जिल्ह्यांतील संपर्क याबाबत अधिक माहिती मिळवणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडीची मागणी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी न्यायालयात केली होती. आरोपींच्या मोबाईल कॉल्स व जप्त कागदपत्रांमधून या रॅकेटचा विस्तार मोठा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, बेकायदा गर्भलिंग तपासणीच्या या जाळ्याचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.



