राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):- आज काळजाला पिळून टाकणारी अशी घटना राहाता शहरात घडली असून आजीसोबत आनंदाने खेळ पाहायला निघालेल्या १३ वर्षीय चिमुकल्या ओमकार गायकवाड याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. मात्र, हा केवळ अपघात नसून चालकाने जाणीवपूर्वक ओमकारच्या अंगावरून पुन्हा गाडी रिव्हर्स घेतल्याचा खळबळजनक आरोप करत आजोबांनी न्यायासाठी आर्त हाक दिली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी आज ओमकारचा मृतदेह थेट राहाता पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन केले.
गुरुवारी रात्री ९:३० च्या सुमारास ओमकार आपल्या आजीसोबत डफचा खेळ पाहण्यासाठी राहाता शहरातील शनी चौकाकडे जात होता. कृष्ण मंदिरासमोर वळण घेत असताना एका भरधाव अर्टिगा कारने आधी आजीला आणि नंतर ओमकारला जोरात धडक दिली. प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ओमकार खाली पडल्यानंतर कार चालकाने माणुसकीला काळिमा फासत गाडी पुन्हा मागे-पुढे घेऊन त्याच्या पोटावरून चाक फिरवले. गंभीर जखमी ओमकारला तातडीने शिर्डी हॉस्पिटलमध्ये हलवले परंतु त्याची प्रकृती खालवत गेली. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला होता, मात्र पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित कारची काच फुटलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात जमा असल्याचे दिसून आले, मात्र घटनेच्या वेळी गाडीला काहीच झाले नव्हते. यामुळे या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय बळावला आहे. आमचा नातू एकुलता एक होता, आमचा कोणाशी वैर नाही, मग त्याला इतक्या निर्दयीपणे का मारले? असा सवाल आजोबा पांडुरंग गायकवाड यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे मयत ओमकारचे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह आणून करण्यात आलेल्या तीव्र आंदोलनानंतर पोलीस यंत्रणा हलली.शनिवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शनिवारी रात्री साडेआठ वाजता राहाता अमरधाम येथे ओमकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी होते.
घटनेत जबाबदार असलेल्या गुंड प्रवृत्तीचे आरोपी यांना कठोर अशी शिक्षा व्हावी. या घटनेमध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य न बजावले अशांवरही कडक कारवाई होणार का अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटली आहे.



