spot_img
spot_img

गर्भलिंग तपास प्रकरणाची व्याप्ती वाढली बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याप्रकरणी श्रीरामपूरातील डॉक्टर राज शेख अटकेत; आरोपींची संख्या १३ वर

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक धागा समोर आला असून, बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या पुरवल्याच्या आरोपावरून श्रीरामपूरातील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १३ झाली आहे.

पोलीस तपासादरम्यान बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा पुरवठा राज अजीज शेख हे करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने पहाटे श्रीरामपूर येथून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या पुरवल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर संबंधित गुन्ह्यात डॉक्टर राज अजीज शेख यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच दोन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांसह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती. नव्या अटकेनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

दरम्यान, गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे बेकायदेशीर मशीन नेमके कुठून आणण्यात आले, त्यामागील एजंट कोण आहेत, याचीही माहिती तपास यंत्रणेला मिळाल्याचे समजते. संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गर्भलिंग निदान झालेल्या महिलांची माहिती संकलित करून पुढील तपास सुरू असून, या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!