spot_img
spot_img

निर्मळ पिंपरी लिंगनिदान रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत; आणखी दोघांना अटक, चार सोनोग्राफी मशीन जप्त

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी पोलीस ठाण्यात दाखल अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून नाशिक जिल्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर या बहुचर्चित प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १८ वर पोहोचली असून त्यामध्ये सहा डॉक्टरांचा समावेश आहे.

या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉ. भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त केली होती. तपास पुढे नेत असताना ढगे नामक आरोपीकडून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले, तसेच अनेक एजंटनाही अटक करण्यात आली.

तपासादरम्यान श्रीरामपूर येथील डॉ. कुटे आणि डॉ. शेख यांनाही अवैध लिंगनिदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याच्याकडून अवैध लिंगनिदानासाठी वापरले जाणारे मशीन जप्त करण्यात आले.

तपास अधिक सखोल केल्यानंतर पुण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून निफाड तालुक्यातील दोन जणांनीही बेकायदेशीररित्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले.

पोलिसांनी निफाड येथून डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे (वय ३३) आणि सागर शांताराम उल्हाळ (वय २५) यांना ताब्यात घेतले. डॉ. वल्टे यांचा करंजगाव येथे दवाखाना असून त्यांनी ठाकरे नावाच्या व्यक्तीकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे तपासात समोर आले आहे. सागर उल्हाळ याच्या लॅबमध्ये संबंधित मशीन ठेवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले.

दोघांनाही न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार अवैध सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!