अहिल्यानगर ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा तालुक्यातील पांढरी पूल येथील औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत अन्याय झाल्याचा आरोप करत शिंगवे तुकाई येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २७) अहिल्यानगर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पांढरी पूल येथील शासकीय औद्योगिक वसाहतीसाठी शिंगवे तुकाई परिसरातील सुमारे १६० शेतकऱ्यांची २५४ हेक्टर पिकाऊ जमीन संपादित करण्यात आली होती. या ठिकाणी काही उद्योग सुरू झाले असले तरी जमीन संपादनावेळी शासन आणि अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. तसेच भूसंपादन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. इतर प्रकल्पांप्रमाणे एकरी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, प्रकल्पग्रस्तांना पांढरी पूल एमआयडीसीमध्ये व्यवसायासाठी हेक्टर २५ गुंठे मोफत जागा उपलब्ध करून द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखले तातडीने द्यावेत, तसेच प्रत्येक बाधित कुटुंबातील किमान एका सदस्याला कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय थकीत नुकसानभरपाई व्याजासह मिळावी, व्यवसायासाठी जागा न दिल्यास अतिरिक्त आर्थिक भरपाई द्यावी, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेत आरक्षण मिळावे आणि शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण मोफत करण्यात यावे, अशाही मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
या उपोषणात राजेश होंडे, पांडुरंग होंडे, म्हातारदेव पुंड, किसन होंडे, सुभाष दिघे, नामदेव कुऱ्हाड, दामोदर पुंड, आशिष ठोकळ, विमल आरु, शरद धइगे, रमेश आरु आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
एमआयडीसी प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास गुरुवार (ता. २८)पासून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश होंडे आणि पांडुरंग होंडे यांनी दिला आहे. यासाठी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



