राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे . त्यामुळे शरद पवार गटाला हा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भाजपमध्ये प्रवेशानंतर अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची उमेदवारीही तनपुरे यांनाच दिली जाणार?.
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू केली असून, मजबूत आणि प्रभावी चेहरा म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर गंभीर चर्चा सुरू असल्याचे बोललं जात आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ मजबूत असल्याने ही जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखी वेग आला. जरी तनपुरे यांनी सार्वजनिकरित्या आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं असलं, तरी पडद्यामागे भाजप नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता भाजप आणि तनपुरे यांच्याकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा राजकीय वर्तुळाला लागली आहे.



