अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्यावर सोमवारी मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट निर्माण झाला. महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचा दावा केला जात असतानाच अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत निवड प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतला.
“माझी कोणतीही माघार नाही. माझ्या नावावर खोटी सही करून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे दाखवण्यात आले आहे,” असा धक्कादायक आरोप पानसरे यांनी केला. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, करण ससाणे यांच्यासह काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीकडून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचा दावा करण्यात आला होता. ससाणे यांनी मात्र स्पष्ट केले की, “नगरसेवकांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला होता, निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चा करून माघार घेतली.”
मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र पानसरे यांच्या आरोपाने संपूर्ण चित्रच बदलले आहे. “अर्ज कायम ठेवला नाही तर आत्महत्या करेन,” असा इशाराही त्यांनी दिल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.
या घडामोडींमुळे बिनविरोध निवडीचा दावा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.




Total Users : 660023