spot_img
spot_img

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात आज  दुपारी एक वाजेच्या सुमारास एका चालत्या कंटेनरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हा कंटेनर पुण्याहून नाशिकच्या दिशेने नवीन चारचाकी गाड्या घेऊन जात होता.

कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली.

घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ घुलेवाडी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

या भीषण आगीत कंटेनरमधील तब्बल सहा चारचाकी गाड्या जळाल्याने लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत. सध्या सुरू असलेल्या वाढत्या उष्णतेमुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!