मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले होते. उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या परंतु तिकीट न मिळालेल्या अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठे यश आले आहे. 17 जागांपैकी महायुतीने ६ जागा या बिनविरोध केल्या आहेत. यामध्ये ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या ६ जांगाचा समावेश आहे. त्यामुळे विधान परिषदेत पुन्हा एकदा महायुतीचा ‘मास्टरस्ट्रोक’ पहावयास मिळाला आहे.
पुणे येथील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून काल राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने विक्रम काकडेंच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला. पुण्यात राष्ट्रवादीचे विक्रम काकडे बिनविरोध विजयी झाले.
अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो देखील त्यांनी मागे घेतला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता. शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज मागे घेतल्याने प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली मात्र त्यांनी देखील माघार घेतली. रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले. नाशिक स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चर्चेत राहिला. हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून तिथून नरेंद्र दराडे उमेदवार आहेत. भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळे या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.
यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली. त्यामुळे मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, सय्यद फारुख यांनी अर्ज मागं घेतला. या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.
सांगली-साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. या ठिकाणी धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप अशी लढत होईल.
नागपूरमध्ये काँग्रेसचे दुसरे क्रमांकावर असलेले उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार असतील.
सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून आ. उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांनी माघार घेतली. सोलापूर विधानपरिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख या दोघांचेच अर्ज आहेत. नागेश अक्कलकोटे यांचा निर्णय स्पष्ट झाला नव्हता. महायुतीला नांदेडमध्ये देखील बंड शमवण्यात यश आलं. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली. याठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर अशी निवडणूक होईल.
भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांची उमेदवारी कायम आहे. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर प्रफुल अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतली. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
अमरावती स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा आमने सामने आहेत. परभणी हिंगोलीत शिंदे सेनेचे सईद खान, उबाठा सेनेचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसच्या सुशील देशमुख यांचा अर्ज या ठिकाणी कायम राहिला, तर, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
धाराशिव-लातूर-बीडमध्ये महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख निवडणूक आखाड्यात आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतील सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. जळगाव विधान परिषदेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील या उमेद्वारांनी माघार घेतली असून तसेच अपक्ष उमेदवार कलीम मणियार, उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख निलेश चौधरी यांनी माघार घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार दीपक धांडे, यांनी माघार घेतली आहे. शिंदेच्या सेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाही. भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि ठाक्रेच्या सेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत.
छत्रपती संभाजीनगर-जालनामध्ये भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे आमने सामने आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिलेली त्या देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून समीर सत्तार यांनी देखील माघार घेतली.
बिनविरोध विजयी उमेदवार
● वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी (भाजप)
● पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
● ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
● रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, (राष्ट्रवादी काँग्रेस)
● यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
● अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजपा)
अकरा ठिकाणी होणार थेट लढत
■ सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
■ जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
■ सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
■ नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
■ भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
■ नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
■ अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित)
■ धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
■ परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
■ छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना
■ नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)



