अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कर्जत येथील सहाय्यक निबंधक मिलिंद प्रल्हादराव राऊत (वर्ग-२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार हे एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार निश्चित करण्यासंदर्भातील ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आला होता. या ठरावाविरोधात एका संचालकाने तक्रार केल्यानंतर ते प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
एसीबीकडे ९ जुलै रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर १० जुलै रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी अधिकाऱ्याने यापूर्वी १० हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करत उर्वरित १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदारांकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच सहाय्यक निबंधक राऊत यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सविता तांबे या पुढील तपास करीत आहेत. कारवाईत संतोष शिंदे, वैभव सुपेकर, बाबासाहेब कराड आणि हारूण शेख यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, शासकीय कामकाजासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.



