spot_img
spot_img

महिला डॉक्टरच्या नावाचा वापर; श्रीरामपूरात बोगस डॉक्टरवर गुन्हा

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- शहरातील वॉर्ड क्रमांक ३ येथील गजानन क्लिनिकमध्ये कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा शासनाची मान्यता नसताना बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. महिला डॉक्टरच्या नावाचा आणि लेटरपॅडचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी विश्वास खैरनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष सुभाष वैरागड यांच्याकडे गजानन क्लिनिकमध्ये अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत विश्वास खैरनार हा डॉ. सुवर्णा खैरनार यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या खुर्चीवर बसून रुग्णांची तपासणी करत असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या लेटरपॅडवर औषधांच्या चिठ्ठ्या लिहून रुग्णांना औषधे देत असल्याचेही निदर्शनास आले.

या प्रकरणी डॉ. वैरागड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१८ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, १९६१ मधील कलम ३३(२) अन्वये मंगळवारी (२१ जुलै) हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलिस आणि तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद व्यक्तीकडून उपचार करून घेऊ नयेत, तसेच अशा बोगस डॉक्टरांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!