संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देणारी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत संगमनेरचे ज्येष्ठ पत्रकार गोरक्ष नेहे यांची राज्य संयोजक म्हणून, तर श्रीगोंदा येथील युवा महिला पत्रकार सौ. गायत्री ढवळे यांची राज्य कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी केली.
या निवडीमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर व श्रीगोंदा परिसरातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही पत्रकारांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोरक्ष नेहे हे गेल्या जवळपास दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, विकासात्मक, प्रशासकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सातत्याने निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख पत्रकारिता केली आहे. पत्रकारितेतील त्यांचा प्रामाणिक दृष्टिकोन, संघटन कौशल्य आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
व्हाईस ऑफ मीडिया संघटनेत त्यांनी मागील दोन ते तीन वर्षांपासून अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत संघटन विस्तारासाठी उल्लेखनीय कार्य केले. जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणणे, नवीन सदस्य नोंदणी, पत्रकारांच्या विविध समस्या राज्य पातळीवर मांडणे, संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण शिबिरे, कॅडर कॅम्प, राज्यस्तरीय अधिवेशने तसेच विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला जिल्ह्यात नवी उभारी मिळाल्याचे मानले जाते.
राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राज्य संचालक गोरक्षनाथ मदने, सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्ष नेहे यांनी संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य कार्यकारिणीत राज्य संयोजकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीगोंदा येथील महिला पत्रकार सौ. गायत्री ढवळे यांनीही पत्रकारिता क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करत व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. महिला पत्रकारांचे प्रश्न, संघटनात्मक कार्य आणि पत्रकार हिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. जिल्हा बैठकीदरम्यान त्यांनी, “संघटना माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती पूर्ण प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि यशस्वीपणे पार पाडेन,” अशी भावना व्यक्त केली होती.
जिल्हा बैठकीनंतर राज्य कार्यकारिणीसाठी दोन प्रतिनिधींची नावे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य संचालक गोरक्षनाथ मदने यांनी गोरक्ष नेहे आणि गायत्री ढवळे यांच्या नावांची शिफारस राज्य कार्यकारिणीकडे केली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत राज्य नेतृत्वाने या दोन्ही नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करत त्यांची महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर नियुक्ती केली.
व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हक्कांसाठी, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार कल्याण योजना, प्रशिक्षण, कायदेशीर मार्गदर्शन तसेच पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी देशभरात कार्यरत आहे. राज्य कार्यकारिणीत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन पत्रकारांची निवड झाल्याने जिल्ह्याचा सन्मान उंचावल्याची भावना पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.
या नियुक्तीनंतर संगमनेर, श्रीगोंदा, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील पत्रकार, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि असंख्य हितचिंतकांनी गोरक्ष नेहे व गायत्री ढवळे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे व्हाईस ऑफ मीडिया संघटना राज्यभर अधिक मजबूत होईल, पत्रकारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचतील आणि पत्रकारांच्या हितासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास पत्रकार बांधवांनी व्यक्त केला आहे.
राज्य कार्यकारिणीतील या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पत्रकारितेला राज्यस्तरावर नवे नेतृत्व लाभले असून, पत्रकारांच्या संघटनात्मक चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




Total Users : 601347