नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :- सोशल मीडियाच्या आडून लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचा प्रकार नेवास्यात समोर आला आहे. ‘नेवासाचे चमकते सितारे’ या इन्स्टाग्राम आयडीवरून नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्याविरोधात मार्च २०२६ पासून सातत्याने बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करत अॅड. सत्यशील घुले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रार अर्जानुसार, संबंधित इन्स्टाग्राम पेजवरून नगराध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात आहे. या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून सामाजिक वातावरणही दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
मार्च २०२६ पासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित इन्स्टाग्राम आयडीमागील व्यक्तीचा शोध घेऊन सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ॲड. सत्यशील घुले यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय न्याय संहिता आणि संबंधित सायबर कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच ‘नेवासाचे चमकते सितारे’ हे इन्स्टाग्राम अकाऊंट कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी केली आहे. या तक्रारीनंतर नेवासा पोलीस आणि सायबर यंत्रणा कोणती पावले उचलतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियाच्या आडून बदनामी
एका तक्रारीमुळे सोशल मीडियावरील फेक किंवा अज्ञात आयडींचा वापर करून होणाऱ्या कथित बदनामीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित आयडीची चौकशी करून कायद्याचे उल्लंघन आढळल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.




Total Users : 601396