मुंबई(जनता आवाज वृत्तसेवा) :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका यंदा होण्याऐवजी थेट २०२७ मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR), न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारीमुळे निवडणूक कार्यक्रम लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात मुदत संपलेल्या २० जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. या निवडणुका डिसेंबर २०२६ किंवा जानेवारी २०२७ मध्ये घेण्याचे नियोजन असले तरी सध्याच्या परिस्थितीत ते आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील १०५ नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे.
SIR नंतरच निवडणुकीची तयारी
राज्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
आरक्षणाचा प्रश्नही कायम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदा आणि संबंधित पंचायत समित्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुकांच्या वेळापत्रकावर त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे.
SIR प्रक्रिया पूर्ण होणे, न्यायालयाचा निर्णय आणि राज्य निवडणूक आयोगाची तयारी या तीन प्रमुख बाबींवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा पाया असलेल्या या निवडणुकांचे बिगुल नेमके कधी वाजणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Total Users : 616098