spot_img
spot_img

‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष देणारी टोळी जेरबंद बारामतीतील तिघांना अटक; ९२ लाखांच्या बनावट नोटा, कार व मोबाईल असा १ कोटींचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- अंधश्रद्धेचा आधार घेत नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो’ असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या तब्बल १८ हजार ४१९ बनावट नोटांसह १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना बनावट नोटा व्यवहारात वापरण्याच्या तयारीत असलेल्या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनायक कॉलनी, वडगाव रोड परिसरात कारवाई करण्यात आली.

पोलीस पथकाने गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, रा. अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, रा. तांदुळवाडी, बारामती) आणि सुरज वसंत कांबळे (वय २७, रा. झारगडवाडी, बारामती) यांना ताब्यात घेतले.

घरझडतीदरम्यान जिन्याखाली ठेवलेल्या पिशवीत भारतीय चलनाच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कोरे कागदाचे बंडल आढळून आले. आरोपींकडून ५०० रुपयांच्या १८ हजार ४१९ बनावट नोटा, पाच मोबाईल आणि व्हॉक्सवॅगन कंपनीची कार (एमएच-१४-डीएफ-०३६५) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘पैशांचा पाऊस’ या नावाखाली फसवणुकीचा डाव

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी यापूर्वी नागरिकांना ‘पैशांचा पाऊस पाडतो’ असे सांगून त्यांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण केली. विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग उघड झाला असून प्रताप धुमाळ (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर), अशोक भीमराव दारकुंडे (रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) आणि ‘अम्मु’ (रा. मालेगाव, जि. नाशिक) हे फरार आहेत. आरोपींनी अशोक दारकुंडे याच्या फॉर्च्युनरमधून मालेगाव येथील ‘अम्मु’कडून २५ हजार रुपयांना बनावट नोटा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १७९, १८०, ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, गणेश लोंढे, शाहीद शेख, संदीप पवार, विष्णू भागवत, सुयोग सुपेकर, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि भाग्यश्री भिटे यांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!